मनपा मराठी शाळा क्रमांक 18 प्रवीण नगर येथे सांस्कृतिक कार्यक्रम “कलाविष्कार”उत्साहात संपन्न

स्थानिक प्रवीण नगर स्थित महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक 18 येथे नुकताच शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम कलाविष्कार मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सुधीर धोत्रे तर उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गजबे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, शाळा निरीक्षक संध्या वसनिक, आरोग्य शहरी केंद्राचे डॉ. मुंदडा हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे बालचित्रपट कलाकार यश अनिल वाकळे हा होता. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे रोपटे देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी लेझीमच्या गजरात व बँडच्या तालात केले. त्यानंतर बालकलाकार यश चे भेटवस्तू व विद्याचे झाड देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्याच्या वडिलांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर यशने आपला अभिनय सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
तसेच शाळेत पार पडलेल्या क्रीडा स्पर्धा मध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महिलांसाठी आयोजित विविध स्पर्धा त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा यामधील विजयी महिलांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रकाश मेश्राम यांनी उपस्थित पालकांना शाळेतील सर्व योजनांचा व सुविधेचा फायदा घेण्याचे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मनपाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार नृत्य सादर केले तसेच नर्सरी व केजीच्या विद्यार्थ्यांनी एक बहारदार कलाकृती सादर केली. त्यानंतर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, लावणी, नाटिका, लोककला, वासुदेव आदी प्रकारचे नृत्यकला सादर केल्या. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली तसेच कु. रिया रवी गुळसुंदरे हिने हिरकणी हा एकपात्री प्रयोग सादर केला.
कार्यक्रमासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची यशस्वीते करिता शाळेतील शिक्षक कु. भाग्यश्री ढोमणे,कु स्वाती धांडगे,कु प्रीती भोकरे, श्री रहीम खान, कु संध्या वसनिक, सौ शुभांगी उंबरकर, कु योगिता निमजे,कु चैताली टोबरे,कु वैशाली महाजन,कु मंजू वानखडे,कु वैशाली केने, सौ कांचन सोळंके,गौरव परणकर आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन चैताली टोबरे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर धोत्रे व आभार भाग्यश्री ढोमणे यांनी मानले.कार्यक्रमाकरिता शाळेतील संपूर्ण विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समिती व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.