वडिलांचे निधन, अर्धा-अर्धा मृतदेह वाटून घेण्याची मोठ्या भावाची मागणी; धक्कादायक प्रकाराची चर्चा

मध्य प्रदेश :- मध्य प्रदेशच्या टीकमगडमध्ये भयानक प्रकार घडला आहे. आई- वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्तीची वाटणीवरून वाद होतात हे अनेकांना माहिती आहे. परंतू, दोन भावांच्या भांडणानंतर वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा हिस्सा मोठ्या भावाने मागितल्याने खळबळ उडाली आहे.
वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जात होती. अंत्य संस्कारावरून दोन भावांतील वाद एवढा विकोपाला गेला की मोठ्या भावाने वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा हिस्साच मागितला. हा प्रकार लिधोराताल गावातील आहे.
ध्यानी सिंह घोष हे ८४ वर्षांचे होते. ते गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होते. रविवारी त्यांचे निधन झाले. वृद्धापकाळात ते धाकटा मुलगा देशराजकडे राहत होते. त्यानेच त्यांचे सर्व आजारपण काढले. जेव्हा ध्यानी सिंह यांच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा त्यांचा मोठा मुलगा किशन देखील गावात आला. गावात येताच त्याने आपण वडिलांवर अंत्यसंस्कार करणार असल्याचे सांगितले. तर धाकट्याने म्हटले की, वडिलांची अंतिम इच्छा होती की धाकट्यानेच अंत्यसंस्कार करावेत.
यावरून या दोघांमध्ये वाद पेटला. गावकऱ्यांनी प्रकरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांना बोलविले. किशन दारूच्या नशेत होता आणि त्याने दोन्ही भाऊ अंतिम संस्कार करू शकतील यासाठी मृतदेहाचे अर्धे-अर्धे तुकडे करावे अशी वादग्रस्त मागणी केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि किशनला समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याची समजूत काढण्यात यश आले आणि तो तिथून अंत्यसंस्कार न करता निघून गेला. धाकटा भाऊ देशराजने अंत्यसंस्कार केले. निम्मा निम्मा मृतदेह वाटून घेण्याचा हा विषय चर्चेचा विषय बनला होता. स्थानिक ग्रामस्थांनीही या घटनेवर अशी कशी कोण मागणी करू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.