अवैध रेती विरोधात पोलिसांची धडक कारवाई

नांदेड :- नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन सुरू आहे. असेच एक उत्खनन नांदेड जिल्ह्यातील वाहेगाव इथे सुरू असल्याची गुप्त माहिती नांदेड पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून नांदेड पोलिसांनी पहाटे पाच वाजल्यापासून कारवाईस प्रारंभ केला. दुपारी तीन वाजेपर्यंत ही कारवाई चालली. स्वतः पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ही कारवाई केली आहे. घटनास्थळी उत्खननाचे साहित्य बघून कुणाचेही डोळे पांढरे होतील असे चित्र होते. या कारवाईत पोलिसांनी एकाच ठिकाणाहून 17 इंजन 10 बोट 30 तराफे एक जेसीबी असा सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनास्थळी चारचाकी वाहनाने जाणे शक्य नसल्याने पोलीस अधीक्षक दुचाकीवर बसून गेले. याप्रकरणी पोलीस विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करीत आहेत रेती नियंत्रणाची जबाबदारी महसूल विभागावर असताना महसूल विभाग मात्र कारवाई मध्ये फारसे स्वारस्य दाखवत नाही. ज्या भागात रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होते त्या भागातील तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांच्यावर शासन आता काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे जिल्ह्यात अवैध रेती उतरण जिथे सुरू असेल त्या प्रत्येक ठिकाणी कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.