कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीच्या तीन गुंडांना अटक केली, ते पीडितेच्या घरासमोर धिंगाणा घालत होते.

कल्याण :- कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणारा क्रूरकर्मा सैतान विशाल गवळी याच्या हस्तकांनी रविवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास बालिकेच्या घरासमोर दहशतीचे वातावरण पसरवले होते. या गुन्ह्यात विशाल गवळी, पत्नी साक्षीसह तुरूंगात आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी विशाल गवळी याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तिघा भावांना पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी तडीपार केले आहे. तरीही बालिकेच्या घरासमोर तीन बदमाशांनी आई, वडिलांच्या घरासमोर मोठ्याने आरडा-ओरडा करत दहशत निर्माण केली. या तिन्ही बदमाशांना पोलिसांनी वेचून गजाआड केले आहे.
आमच्या माणसांना जामीन झाला नाहीतर एके 47 बंदूक घेऊन येतो आणि दाखवतो. अशा धमक्या देऊन दगडफेक करत घरासमोरील सामान इतस्ततः फेकून देत पातेले उचलून एका रहिवाशाच्या अंगावर फेकून शिवीगाळ केली. पीडित कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न तीन जणांनी केला. हा प्रकार पुना लिंक रोडला असलेल्या नंदादीप नगर परिसरात घडला होता. पहाटेच्या सुमारास अचानक घडलेल्या या प्रकाराने रहिवाशांसह पीडित कुटुंबीय भयभीत झाले होते. एकीकडे पोलिसांनी कल्याण पूर्वेतील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. तरीही दुसरीकडे काही बदमाश आजही कल्याण पूर्व भागात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.
तिघे बदमाश पीडित कुटुंबीयांच्या घरासमोर दहशत माजवताना शिवीगाळ, धमक्या, दगडफेक करत असल्याचे नंदादीप नगर भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. या घटनेची पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी कोळसेवाडी पोलिसांना तातडीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तपास चक्रांना वेग दिला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या पुरुषोत्तम दिलीप शेलार उर्फ वझडी बाबू या मुख्य सूत्रधारासह त्याचे अन्य दोन साथीदार साहील कालवार आणि अनिकेत नितनवरे यांना ताब्यात घेतले आहे. या तिघांची कोळसेवाडी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पहाटेच्या सुमारास पीडित कुटुंबीयांच्या घराबाहेर जाऊन दहशत माजविण्याचा या तिघांचा मूळ उद्देश काय होता ? तसे करण्यासाठी त्यांना कुणी चिथावणी दिली होती का ?अशा अनेक बाजूंनी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.