“रवि शास्त्रीचं भाकीत: टीम इंडियात ‘हा’ खेळाडू नसेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यता 30% कमी होईल!”

इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळल्यावर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात एकूण 8 संघांनी सहभाग घेतलाय. 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु यंदा पुन्हा एकदा टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याचा प्रयत्न करेल. परंतू त्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापत ग्रस्त असल्याने भारताचा टेन्शन वाढलं आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह याच्या पाठीला दुखापत झाली होती. बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात संधी दिली असली तरी दुखापतीमुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीतील किती सामने खेळेल यावर अजूनही शंका आहे. सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये असून तो सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. त्याच्या फिटनेसचा रिपोर्ट लवकरच बीसीसीआयला पाठवला जाईल, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिजमधून तो पूर्णपणे बाहेर असेल.
काय म्हणाले रवि शास्त्री?
रवि शास्त्रीने आयसीसी सोबत बोलताना म्हटले की, ‘मला वाटतं की ही खूप मोठी जोखीम आहे. कारकिर्दीच्या या टप्प्यावर आहे की तो संघासाठी एवढा किमती आहे की त्याला अचानक गेमसाठी बोलावण्यात येईल आणि चांगली कामगिरी करायला सांगितली तरी अपेक्षा जास्त असतील. ते विचार करतील की बुमराह येईल आणि आग लावेल. जेव्हा तुम्ही दुखापतीतून पुनरागमन करता तेव्हा ते इतकं सोपं नसतं.
30% कमी होतील जिंकण्याची शक्यता
माजी प्रशिक्षक रवि शास्त्रीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुमराह भारतासाठी किती महत्वाचा आहे हे देखील सांगितले. शास्त्री म्हणाले की, ‘बुमराहच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाच्या योजनांना मोठा धक्का बसणार आहे. बुमराह फिट नसल्याने भारताची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची शक्यता 30% कमी होईल. पूर्णपणे तंदुरुस्त बुमराह खेळत असताना, तुम्हाला डेथ ओव्हर्सची खात्री असते. तो पूर्णपणे वेगळा खेळ झाला असता’.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे दोन ग्रुप :-
ग्रुप ए – पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश
ग्रुप बी – दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड
टीम इंडिया ग्रुप स्टेज सामने : –
20 फेब्रुवारी : गुरुवार – भारत विरुद्ध बांगलादेश – ठिकाण : दुबई
23 फेब्रुवारी : रविवार – भारत विरुद्ध पाकिस्तान – ठिकाण : दुबई
2 मार्च : रविवार – भारत विरुद्ध न्यूझीलंड – ठिकाण : दुबई