“अमरावती एमआयडीसीत एसीबीची धाड; लाचखोर मोतीराम ढोरे अटक”

अमरावती :- अमरावती एमआयडीसीतील भूखंडाचे श्रीखंड खाण्यासाठी चटावलेल्या एका लाचखोर कर्मचाऱ्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून लाच घेतांना रंगेहाथ पकडले असून अमरावतीच्या कार्यालयात अगदी बिनधास्त चालणाऱ्या लाचखोरीच्या रॅकेट मधील छोटा का होईना पण एक तरी मासा गळाला लागला आहे.
अॅन्टी करप्शन ब्यूरो,अमरावती यांच्याकडे आलेल्या तक्रारदार यांच्या बहीणीच्या नावावर एमआयडीसी, अमरावती अंतर्गत नांदगाव पेठ येथे भूखंड आहे. तकारदार यांचे वडीलांना कॅन्सर असल्याने त्यांच्या वैदयकिय उपचाराकरीता पैशांची आवश्यकता भासल्याने सदरचा भूखंड परत करुन त्याची भरणा केलेली रक्कम ९,३०,००० रू. लवकर मिळवुन देण्याकरीता एमआयडीसी अमरावती येथील संबंधित कर्मचारी ढोरे यांने २५,००० रुपये लाचेची मागणी केल्याबाबत दि. ३१/०१/२०२५ रोजी तकार दिली होती.
सदर तक्रारीवरुन दि.०३/०२/२०२५ रोजी व दि. ०४/०२/२०२५ रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान ढोरे नामक कर्मचाऱ्याने यापूर्वी दिलेले ५,००० मिळाल्याचे मान्य करून उर्वरीत रक्कमेपैकी १०,००० रुपये आता आणून दया व बाकीचे काम पुर्ण झाल्यावर १०,००० रुपये द्या,असे म्हणून लाच रक्कम स्विकारण्याची समंती दर्शविली.
त्यानुसार मंगळवार दि.०४/०२/ २०२५ रोजी पंचासमक्ष आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान मोतीराम माणिकराव ढोरे, वय ४२ वर्षे, पद सहाय्यक (वर्ग-३), एम.आय.डी.सी प्रादेशिक कार्यालय, अमरावतीरा.एमआयडीसी,शासकीय निवासस्थान क्र.१०२,जुना बायपास रोड, अमरावती यांने सदर प्लॉटची फाईल लवकरात लवकर काढुन देण्यासाठी १०,००० रुपये लाच रक्कमेचा पहिला हप्ता स्विकारल्याने त्यांस रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नमुद आरोपीविरुध्द पो.स्टे.राजापेठ, अमरावती शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कार्यवाही मंगेश मोहोड,पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि.अमरावती,यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पो.नि. भारत जाधव,पो.नि.केतन मांजरे,पो.नि.संतोष तागड, पो.हवा.प्रमोद रायपुरे,पोलीस अंमलदार उपेंद्र थोरात, युवराज राठोड,आशिष जांभोळे, शैलेश कडु,पोउपनि.सतिष किटुकले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.