अमरावती-परतवाडा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य – अपघातांना निमंत्रण! नागरिकांमध्ये तीव्र संताप!

अमरावती :- अमरावती-परतवाडा महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत.
या महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत असून, वलगाव ते आसेगाव या दरम्यान रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.🛑 नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.
‘आम्ही रोज याच रस्त्यावरून प्रवास करतो. खड्डे एवढे मोठे आहेत की, कधी गाडी पलटी होईल याची शाश्वती नाही. प्रशासनाने हे त्वरित दुरुस्त करावे, अन्यथा मोठा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल.’ – असे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे.‘रस्त्यांवरील खड्डे जीवघेणे झाले आहेत. सरकार फक्त घोषणाच करते, प्रत्यक्षात काहीच सुधारणा होत नाहीत.’
‘रस्त्याची दुरवस्था पाहता, येत्या काही दिवसांत मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे. प्रशासन कधी जागे होणार?’
अमरावती-परतवाडा महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवासी धोक्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा मोठा जनआक्रोश उफाळण्याची शक्यता आहे.
या प्रकरणावर प्रशासन कोणती पावले उचलते, यावर ‘सिटी न्यूज’ लक्ष ठेवून राहील.