“कल्याण-डोंबिवलीमध्ये रात्रीच्या अंधारात एमडी ड्रग्स, गांजा तस्करी: डीसीपी स्कॉडची मोठी कारवाई”

कल्याण :- कल्याण- डोंबिवली आजूबाजूच्या परिसरात अमली पदार्थ विकणाऱ्या तसेच नशेखोराविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. कल्याण डीसीपी स्कॉडने गस्ती दरम्यान चार गांजा, एमडी तस्करांना ताब्यात घेतले आहे. या तिघांकडून सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचा गांजा व एमडी जप्त करण्यात आले आहे. तर गेल्या महिनाभरात एकूण १९ गांजा व एमडी तस्करांना कल्याण डीसीपीने बेड्या ठोकल्या आहेत.
सुनील यादव, शंकर गिरी, सचिन कावळे, अमन गुप्ता असे डीसीपी पथकाने ताब्यात घेतलेल्या तस्करांची नावे आहेत. कल्याण- डोंबिवली मधील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरता कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण व त्यांचे पथक कल्याण डोंबिवली परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान डोंबिवली पूर्वे एमआयडीसी परिसरात एक इसम संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला.
गस्तीदरम्यान चौघे ताब्यात
पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतलं असता त्याच्याजवळ आठ ग्रॅम एमडी अमली पदार्थ आढळून आला. हा एमडी ड्रग्स त्याने विकण्यासाठी आणल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तत्काळ सनिल यादव यास त्याला अटक केली. तर डोंबिवली पश्चिमेकडील राजाजी पथ परिसरात एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या सचिन कावळे व अमन गुप्ता या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडे तब्बल ९३ हजार रुपये किमतीचा एमडी ड्रग्स आढळून आले.
महिनाभरापासून सातत्याने कारवाई
तसेच कल्याण पश्चिमेकडे दुर्गामाता चौक भटाळे तलाव येथे शंकर गिरी या गांजा तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून तब्बल १० किलो गांजा हस्तगत करण्यात आला. मागील महिनाभरापासून डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कल्याण- डोंबिवलीमध्ये अमली पदार्थ तस्करी विरोधात फार्स आवळला आहे. रात्री अप रात्री धिंगाणा घालणाऱ्या नशेखोरांविरोधात देखील पोलिसांची सातत्याने कारवाई सुरू आहे. यामुळे गेल्या महिन्याभरात कल्याण डोंबिवली पोलिसांनी तब्बल १९ गांजा व एमडी तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.