LIVE STREAM

Latest NewsMaharashtraMaharashtra Politics

संरक्षण उत्पादन क्षेत्रात पॉलिसी तयार करणारे ‘महाराष्ट्र’ पहिले राज्य!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज चाकण, पुणे येथील निबे लिमिटेडच्या वर्धापन दिन सोहळ्यात निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लिमिटेडच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि लघु शस्त्रास्त्र निर्मिती सुविधेचे उद्घाटन तसेच शिर्डी येथील सुविधेचे भूमिपूजन पार पडले. तसेच याप्रसंगी महाराष्ट्र शासन व संरक्षण क्षेत्रातील नामांकित कंपन्यांसोबत 5 सामंजस्य करार करण्यात आले.

जगातील जे श्रीमंत देश पाहायला मिळतात, त्यांच्या पाठीशी त्या देशातील संरक्षण उत्पादक कंपन्या आहेत. दुर्दैवाने संरक्षण उत्पादनांमध्ये भारत मागे राहिला. आपण अनेक आयुध निर्मिती करणारे कारखाने सुरू केले; त्यांनी चांगले कामही केले. मात्र जे अ‍ॅडव्हान्समेंट व्हायला हवे होते ते होऊ शकले नाही, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, कारगिल योद्धासारखा प्रसंग पुन्हा उद्भवला, तर एका राफेलच्या भरवश्यावर आपण उंचीवर असलेल्या शत्रूवर वार करू शकतो. त्याठिकाणी आपल्याला सैनिक पाठवण्याची गरज नाही. तंत्रज्ञानाच्या या वॉर फेअरमध्ये भारताला प्रायमसी मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयात करण्यात येणाऱ्या गोष्टींमधील काही कंपोनंट भारतातच तयार करावे लागतील, अशी अट ठेवली. या अटीमुळेच भारतात पहिल्यांदा काही कंपोनंट बनवण्यास सुरुवात झाली. हीच डिफेंस इकोसिस्टमची नांदी होती. हेच कंपोनंट बनवता बनवता भारत शस्त्रास्त्रांची निर्मिती करू लागला. सध्या ६०% पेक्षा जास्त कंपोनंट भारतात बनवले जात आहेत. संरक्षण क्षेत्रात सर्व गोष्टी आयात करणारा भारत आज जवळपास ₹२५,००० कोटींची निर्यात करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

२०१७ साली, महाराष्ट्राने संरक्षण उत्पादन क्षेत्रात देशातील पहिली पॉलिसी तयार केली. त्यावेळी संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअपसाठी ₹१०० कोटींचा फंड तयार करण्यात आला होता, ज्यातून जवळपास ३०० स्टार्टअप्स सुरु झाले. केंद्र सरकारचे डिफेन्स क्लस्टर उत्तरप्रदेश आणि तमिळनाडूमध्ये असले तरी, देशाचे खरे डिफेन्स क्लस्टर महाराष्ट्रात, विशेषतः पुण्यात आहे. येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. ज्यामुळे भारताला जगातील आधुनिक देशांमध्ये स्थान मिळत आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले.

भविष्यातील लिथियम आयर्न बॅटरीचे महत्त्व गणेश निबे यांनी आधीच ओळखले होते. त्यांच्यातील इनोव्हेशन आणि दूरदृष्टीमुळे ते आज मोठे झाले आहेत. त्यांनी हिमतीने या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि आज त्यांच्या कार्याचे सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे. यावर्षी देखील डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करणार, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आश्वस्त केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, निबे लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे, निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.चे संचालक प्रकाश भामरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!