अवघ्या ८ महिन्यांत गेम फिरला, भाजपनं घेतला बदला; सर्वांच्या नजरा दिल्लीकडे असताना वचपा काढला

मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला फटका बसला. भाजपच्या ६३ जागा घटल्या. त्यामुळे पक्ष बहुमतापासून दूर राहिला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात
लखनऊ: मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला फटका बसला. भाजपच्या ६३ जागा घटल्या. त्यामुळे पक्ष बहुमतापासून दूर राहिला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात बसलेला फटका भाजपला महागात पडला. २०१९ मध्ये उत्तर प्रदेशात ८० पैकी ६६ जागा जिंकणाऱ्या भाजपप्रणित एनडीएच्या जागा थेट ३० वर आल्या. तर विरोधकांच्या इंडिया ब्लॉकनं ६ वरुन ४३ पर्यंत मजली मारली. त्यातच अयोध्येतील पराभव भाजपच्या सर्वाधिक जिव्हारी लागला. पण आता भाजपनं याच अयोध्येत पुनरागमन केलं आहे. पोटनिवडणुकीत भाजपनं दणदणीत विजयाची नोंद केली आहे.
अयोध्या म्हणजेच फैझाबाद लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसाद यांनी विजय मिळवला. भाजपच्या लल्लू सिंह यांचा ५४ हजार ५६७ मतांनी पराभव करत अवधेश प्रसाद यांनी विजय मिळवला आणि लोकसभा गाठली. राम मंदिराच्या लोकार्पणानंतर अवघ्या काही महिन्यांत झालेल्या निवडणुकीत अयोध्या येत असलेल्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. त्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. पण अवघ्या ८ महिन्यांत भाजपनं पराभवाचा वचपा काढला आहे.
अवधेश प्रसाद लोकसभेवर गेल्यानं मिल्कीपूर विधानसभेची जागा रिक्त झाली. समाजवादी पक्षानं तिथून अवधेश प्रसाद यांचे चिरंजीव अजित प्रसाद यांना उमेदवारी दिली. भाजप आणि सपासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं बाजी मारली. ८ महिन्यांपूर्वी फैजाबाद लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाचा बदला भाजपनं मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत घेतला. जूनमध्ये झालेल्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मिल्कीपूरमध्ये जातीनं लक्ष घातलं होतं.
मिल्कीपूरमध्ये दणदणीत विजय मिळवत भाजपनं अयोध्येतील पराभवाचा बदला घेतला आहे. राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला झाली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत लोकसभा निवडणूक लागली. त्यात राम मंदिर येत असलेल्या फैजाबादमध्ये भाजपला नामुष्की सहन करावी लागली. फैजाबादमध्येच मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघ येतो. तिथल्या पोटनिवडणुकीत भाजपनं नेत्रदीपक विजय साकारला आहे.
मतमोजणीला सुरुवात होताच भाजपच्या चंद्रभानू पासवान यांनी आघाडी घेतली. हळूहळू त्यांची आघाडी वाढत गेली. अखेर ५५ हजारांहून अधिक मतांनी पासवान यांनी अजित प्रसाद यांचा पराभव केला. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. त्यामुळे मिल्कीपूर पोटनिवडणुकीत आदित्यनाथ स्वत: लक्ष घातलं. त्यांनी मतदारसंघात जनसभा घेतल्या. कॅबिनेट मंत्रीदेखील ठाण मांडून बसले. जबाबदार नेत्यांकडे मिल्कीपूरचं मिशन सोपवण्यात आलं. जवळपास अर्धा डझन इच्छुक असताना भाजपनं पासवान यांना तिकीट दिलं आणि त्यांनी दणदणीत विजय मिळवला.