प्रियकराकडून लेकीचे ३५ तुकडे, निर्घृण हत्येनं खचलेल्या वडिलांचं निधन; अखेरची इच्छा अधुरीच

श्रद्धा वालकरचे वडील विकास यांचं मुंबईत हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते त्यांच्या पत्नीसोबत वसईत वास्तव्यास होते. श्रद्धा वालकरची (वय २७ वर्षे) १८ मे २०२२ रोजी दिल्लीच्या महरोली परिसरातील घरात तिचा प्रियकर आणि लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पुनावालानं हत्या केली. श्रद्धा आणि आफताब महरौलीत एका घरात भाड्यानं राहत होते.
लेकीच्या निर्घृण हत्येनंतर विकास वालकर यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. मुलीच्या मृतदेहाच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांची प्रतीक्षा सुरु होती. पण श्रद्धाच्या मृतदेहांचे अवशेष पोलीस तपासातील पुरावा असल्यानं विकास वालकर यांना ते देण्यात आले नाहीत. त्यामुळे लेकीच्या मृतदेहाच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्याची विकास यांची इच्छा अधुरीच राहिली. श्रद्धाच्या निर्घृण हत्येचा उलगडा तब्बल ६ महिन्यांनंतर झाला.
श्रद्धा आणि आफताब यांचे प्रेमसंबंध वालकर कुटुंबाला अमान्य होते. त्यामुळे श्रद्धानं कुटुंबाशी असलेला संपर्क तोडला. श्रद्धा काही मित्रमैत्रिणींच्या संपर्कात होती. त्यातील काहींचा श्रद्धाशी दीड महिने संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांनी याची माहिती श्रद्धाच्या वडिलांना दिली. यानंतर वसई पोलिसांनी श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतली. मग प्रकरणाचा तपास सुरु झाला. श्रद्धा तिचा प्रियकर आफताबसोबत दिल्लीत असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. त्यानंतर वसई पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला.
दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा शोध सुरु केला. त्यानंतर आफताबला महरौलीला तो वास्तव्यास असलेल्या भाड्याच्या घरातून अटक केली. पोलिसांना त्याच्या घरातील फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे शिल्लक राहिलेले तुकडे, रक्ताचे डाग आणि अन्य पुरावे सापडले. पोलीस चौकशीत आफताबनं गुन्ह्याची कबुली दिली. १८ मे २०२२ रोजी श्रद्धासोबत वाद झाला. त्यावेळी संतापाच्या भरात श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्याचं आफताबनं पोलिसांना सांगितलं.
श्रद्धाची हत्या लपवण्यासाठी आफताबनं तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते तुकडे त्यानं फ्रिजमध्ये ठेवले. श्रद्धाची ओळख लपवण्यासाठी त्यानं तिचा चेहरा जाळला. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताब पुढील १८ दिवस रात्री २ च्या सुमारास छतरतूरमधील जंगलात जायचा आणि काही तुकडे जंगलात फेकून द्यायचा. दिल्ली पोलिसांनी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याला बेड्या ठोकल्या.