बडनेरा नववस्ती येथे माता रमाबाई आंबेडकर जयंतीचा भव्य उत्सव
त्याग आणि बलिदानाचे प्रतीक माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त बडनेरा नववस्तीमध्ये कपिल बुद्ध विहार मंडळाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेच्या निनादात आणि आतिषबाजीसह हजारो बौद्ध अनुयायांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला.
बडनेरा नववस्ती परिसरात कपिल बुद्ध विहार मंडळाच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. माता रमाबाई या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय प्रवासात आधारस्तंभ होत्या. त्यांच्या त्यागमय जीवनाचा गौरव करत बौद्ध अनुयायांनी मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी केली.
शोभायात्रेला कपिल विहार मंडळापासून सुरुवात झाली. समता चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जयहिंद चौक, जयस्तंभ चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करून यात्रा पुन्हा कपिल मंडळाच्या प्रांगणात विसर्जित झाली.
या शोभायात्रेत महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. तसेच तरुणाईने डीजेच्या तालावर नाचत जल्लोष साजरा केला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि आतिषबाजीने परिसर उजळून गेला.
“बडनेरा नववस्तीमध्ये माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली ही भव्य शोभायात्रा लाखो बौद्ध अनुयायांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरली. या जयंतीत महिलांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. पुढच्या वर्षीही अशाच उत्साहात जयंती साजरी होईल, अशी अपेक्षा.