भाड्याने वाहने नेत परस्पर विक्री; सहा जणांची टोळी धुळे पोलिसांच्या ताब्यात

धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहने भाड्याने नेण्याच्या नावाने वाहनांची परस्पर विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती
धुळे : कोण कशा पद्धतीने फसवणूक करेल हे सांगणे आता कठीण झाले आहे. त्यानुसार धुळ्यामध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. यात भाड्याने वाहने नेण्याच्या नावाखाली त्या वाहनांची परस्पर विक्री करणारी एक टोळी सक्रिय झाली होती. पोलिसांनी या टोळीचा फर्दाफ़ाश केला असून त्यांना दोन कारसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
धुळे तालुका पोलीस ठाण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहने भाड्याने नेण्याच्या नावाने वाहनांची परस्पर विक्री केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले होते. त्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे तालुका पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवली असता यात टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सदर टोळीचा तपास लावत सापळा रचला.
सापळा रचत सहा जण ताब्यात
धुळे तालुका पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत भाड्याने वाहने नेण्याच्या नावाखाली परस्पर वाहनांची विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून दोन कारसह काही मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. या प्रकरणी पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.