Amaravti GraminLatest News
विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा

धारणी येथे आज राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा पार पडला. या शिबिरात विविध न्यायमूर्ती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.
9 फेब्रुवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील जिल्हा परिषद मैदानावर विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक, न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नितीन सांबरे हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात अमरावतीचे जिल्हाधिकारी तथा प्रभारी विभागीय आयुक्त सौरभ कटियार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या आयोजनात जिल्हा विधी सेवा समिती धारणीचे अध्यक्ष इंद्रजीत कोळी, सचिव मंगला कांबळे आणि तालुका वकील संघ धारणीचे पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले.
शिबिरात मेळघाटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शासनाच्या विविध योजनांची माहिती, अंमलबजावणीची प्रक्रिया आणि शासकीय कार्यालयांमध्ये अडचणी सोडवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. तर, धारणीतील या विधी सेवा महाशिबिरामुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या न्यायिक आणि प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मंच मिळाला.