विदर्भातील सर्वात मोठी बहिरम बाबा जत्रेत उत्साह

विदर्भातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक बहिरम बाबा जत्रेचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. एक महिना चाललेल्या या जत्रेत रविवारी भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. हंडीचा आस्वाद, पाळण्याचा आनंद आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी जत्रेचा शेवट गाजला. पण, याच जत्रेत व्यापाऱ्यांनी मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चला पाहूया ह्या प्रतिनिधि नितेश किल्लेदार यांच्या विशेष रिपोर्टमध्ये!
विदर्भातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी भरणारी बहिरम बाबा जत्रा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जत्रांपैकी एक मानली जाते. भैरव नावाने प्रसिद्ध असलेल्या बहिरम बाबांच्या जत्रेत लाखो भाविक सहभागी होतात. यंदाही जत्रेने भव्यतेने रंगत आणली.
गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या या जत्रेचा समारोप रविवारी पार पडला. या दिवशी विशेष हंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे हजारो भक्तांनी प्रसादाचा आनंद घेतला. तसेच, शेवटच्या दिवशी नागरिकांनी पाळण्याचा आनंद घेत जत्रेची शोभा वाढवली.
या जत्रेत धार्मिक विधींबरोबरच शंकरपट आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसाठी हा अध्यात्मिक सोहळा असला तरी व्यापाऱ्यांसाठीही हा मोठा व्यवसायिक उत्सव असतो. मात्र, यंदा व्यापाऱ्यांना सोयी-सुविधांचा अभाव जाणवला.
व्यापाऱ्यांनी मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचे स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा, वीज व्यवस्था आणि स्वच्छतागृहांसारख्या सुविधांच्या अभावामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात बहिरम बाबा संस्थेच्या सदस्यांनी व्यापाऱ्यांसाठी योग्य सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे.
तर पाहिलंत, बहिरम बाबा जत्रेचा आनंद भक्त आणि नागरिकांनी घेतला, मात्र व्यापाऱ्यांच्या अडचणीही लक्षवेधी ठरल्या. आता पाहावे लागेल की प्रशासन या मागण्यांकडे कशा प्रकारे लक्ष देते. आपणास काय वाटते? प्रशासनाने या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करावी का? आपली मते आम्हाला कळवा!