सिटी न्यूज विशेष रिपोर्ट: म्हाडा कॉलनीतील अस्वच्छतेचा कहर !

अमरावती :- स्वच्छ भारत अभियानाच्या गजरातही अमरावतीतील म्हाडा कॉलनी विलास नगर येथे मात्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गेली दोन वर्षे येथील नाल्या स्वच्छ करण्यात आल्या नाहीत, त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कानाडोळा करत आहे. याच घाणीचा पर्दाफाश करण्यासाठी सिटी न्यूजच्या टीमने थेट नालीत उतरून घेतला विशेष आढावा.
विलास नगरातील म्हाडा कॉलनीमध्ये अस्वच्छतेचा कहर पाहायला मिळत आहे. रहिवाशांच्या घराशेजारील नाल्या तुडुंब भरलेल्या असून, गेल्या दोन वर्षांपासून त्यांची साफसफाई झालेली नाही. दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी थेट नालीत उतरून येथील दुर्दशेचा अभ्यास केला आणि संपूर्ण वस्तुस्थिती समोर आणली.
रहिवाशांनी सांगितले की, ”स्वच्छता कर्मचारी प्रत्यक्षात दिसत नाहीत, मात्र त्यांच्या हजेरीचे कागद भरले जातात. कामे होत नसताना कंत्राटदारांना पैसे कसे दिले जातात? यामागे कोणाचा आशीर्वाद आहे?” असे संतप्त प्रश्न विचारले जात आहेत.
या घाणीमुळे येथील लहान मुले, वृद्ध, आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथींचा धोका निर्माण झाला असून, येथील दुर्गंधीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. प्रशासन आणि संबंधित स्वच्छता कंत्राटदार याकडे लक्ष देतील का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विलास नगरातील म्हाडा कॉलनीमध्ये अस्वच्छतेची ही गंभीर स्थिती आहे. रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासन आणि स्वच्छता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत. सिटी न्यूजच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडण्यात आली असून, आता प्रशासन कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आम्ही यासंबंधी अधिकाऱ्यांकडून उत्तर मागणारच आहोत. हा विशेष अहवाल फक्त सिटी न्यूजवर!