LIVE STREAM

Crime NewsLatest News

लहानपणी आई-वडिलांची हत्या डोळ्यांसमोर पाहिली, ३४ वर्षांनी घेतला बदला; IT इंजिनिअरने एकाच कुटुंबातील ५ जणांना संपवलं

वाराणसी : वाराणसीमध्ये ५ नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच घरात चार जणांचे मृतदेह आढळले. आई, दोन मुलं आणि एका मुलीचा मृतदेह घरात आढळला. तर घरापासून काही अंतरावर कुटुंबाचे प्रमुख राजेंद्र गुप्ता यांचा मृतदेह आढळला. महत्त्वाची बाब म्हणजे हत्या करण्यात आलेले सर्वजण एकाच घरातील कुटुंबीय होते. पाचही लोकांच्या डोक्यात गोळी मारुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या हसत्या-खेळत्या कुटुंबाच्या हत्याकांडने अनेकजण हैराण आहेत.
३४ वर्षांपूर्वीच्या घटनेचा खुलासा
पाच जणांच्या हत्येनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामुळे ३४ वर्षांपूर्वीच्या घटनेचा उलगडा झाला. ज्याची आता हत्या करण्यात आली त्या राजेंद्र गुप्ताने ३४ वर्षांपूर्वी त्याच्या छोट्या भावाला आणि त्याच्या पत्नीला अशाच प्रकारे गोळी मारुन त्यांची हत्या केली होती. त्यानंतर राजेंद्र गुप्ताने आपल्या वडिलांनाही गोळी मारुन संपवलं.
राजेंद्र गुप्ताने आपल्या भावाला मारलं, त्या भावाला दोन मुलं आणि एक मुलगी अशी तीन मुलं होती. या तिघांना राजेंद्रने आपल्या घरातच ठेवून वाढवलं. तो त्या तीन मुलांना नेहमी मारहाण करायचा. पण हळूहळू मुलं मोठी होत गेली. तीन मुलांपैकी एका मुलीचं लग्न झालं. तर दोन मुलं कामासाठी दिल्लीत गेली. आयटी कंपनीत नोकरी करू लागली. या दोन भावांपैकी मोठा भाऊ विशाल गुप्ता याने आपल्या आई-वडिलांना आणि आजोबांना आपला काकाने कशाप्रकारे संपवलं हे आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. विशाल ३४ वर्ष होऊनही ही घटना विसरू शकत नव्हता. अखेर त्यानेच आपल्या काकाला अर्थात राजेंद्र गुप्ताला आणि त्याच्या कुटुंबाला घरातच गोळी मारुन संपवलं आणि ३४ वर्षांचा बदला घेतला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या या हत्याकांडचा आरोपी तीन महिन्यांनी पोलिसांच्या ताब्यात आला.
विशाल गुप्ताने पाच जणांना त्याच प्रकारे आणि त्याच ठिकाणी शरीरात गोळी मारली जिथे त्याच्या काकाने राजेंद्र गुप्ताने त्याच्या आई, वडील आणि आजोबांना गोळी मारली होती. हे हत्याकांड करुन विशाल फरार झाला आणि तो विविध शहरात लपून राहत होता. घटनेच्या तीन महिन्यांनी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांच्या चौकशीत विशालने या पाच जणांच्या हत्याकांडचा खुलासा केला.
पाच जणांची हत्या करणारा विशाल गुप्ता ७ वर्षांच्या असताना त्याच्या काकाने त्याच्या आई, वडिलांना ठार केलं. वयाच्या ७व्या वर्षी त्याने त्याच्या आई-वडिलांना गमावलं. नंतर तीन भावंड हत्या केलेल्या काकाच्या घरातच राहू लागली. पण यावेळी काकाने आपल्या भावंडांचा आणि आपला कशाप्रकारे छळ केला हे तो पाहत होता. लहानपणीचा राग डोक्यात ठेवून उच्चशिक्षित तरुणाने हे हत्याकांड केलं. आपल्या आई-वडिलांच्या मारेकऱ्याला संपवल्याचा, आपल्या भावंडांचा छळ केलेल्या व्यक्तीला आपण संपवलं याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. पोलिसांना हत्याकांडची माहिती देताना, त्याला कोणताही पश्चाताप झाला नव्हता, तो या हत्याकांडनंतरही अतिशय शांत वाटत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!