विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटर द्वारे आयोजित परिसंवाद स्पर्धेचा निकाल जाहीर
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटर अंतर्गत विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ‘लिंगभाव आणि समाज’ या मुख्य विषयावर विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रातील सेमिनार हॉलमध्ये परिसंवाद स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ‘स्थलांतराचा स्त्रियांवर होणारा परिणाम’, ‘महिला उद्योजकता : आव्हाने आणि संधी’ आणि ‘समकालीन काळातील पितृसत्तेचे स्वरूप’ असे तीन उप विषय देण्यात आले होते. विद्यापीठातील शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख व शिक्षक आणि संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक यांच्या सहकार्यामुळे स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत तक्षशिला महाविद्यालय, अमरावती येथील निधी ज्ञानेश्वर देवरे यांचा प्रथम क्रमांक आला. श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, अमरावती येथील शिवानी प्रदीप जयस्वाल यांचा द्वितीय क्रमांक आला तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातील नितीन नागासेन गवई यांचा तृतीय क्रमांक आला. याशिवाय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील अक्षरा ज्ञानेश्वर धनधरे व सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अमरावती येथील पल्लवी रमेश गवई यांना प्रोत्साहनपर क्रमांक देण्यात आला.
परिसंवाद स्पर्धेतील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या परिसंवाद सादरीकरण स्पर्धेचे परीक्षण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या मा. प्रा. वनिता राऊत यांनी केले. यावेळी विचारमंचावर अध्यक्ष म्हणून वुमेन्स स्टडीज सेंटरच्या सह समन्वयक डॉ. वैशाली धनविजय यांसह डॉ. भगवान फाळके उपस्थित होते.