16 हजारांचा पगार अन् क्लर्ककडे बीएमडब्ल्यू कार, 16 लाखांचा गॉगल

छ्त्रपती संभाजीनगर :- छ्त्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील आरोपी हर्षने घेतलेला 16 लाखांचा हिरेजडित विदेशी चष्मा पोलिसांनी जप्त केलाय. तो हिरेजडित चष्म दुरुस्तीसाठी थेट जर्मनीला पाठवला होता. विभागीय क्रीडा संकुलाचा 21.59 कोटींच्या घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. पोलिसांकडून या सर्व रकमेतून घोटाळ्याचा मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरने खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू असून, पाच चष्यांपैकी विदेशात दुरुस्तीसाठी पाठविलेला 16 लाख रुपयांचा हिरेजडित चष्मा पोलिसांनी जप्त केला.
हर्षकुमार क्षीरसागर याने संकुलासाठी आलेल्या निधीतून 21.59 कोटी रुपये ढापले. त्यातून आलिशान फ्लॅट, महागड्या गाड्या, हिरेजडित चष्यांसह विदेशी वाऱ्याही केल्या. हर्षकुमारने घोटाळ्याच्या रकमेतून 40 लाख रुपयांचे पाच चष्मे खरेदी केले होते. एका वादाच्या दरम्यान त्याचा यातील एक १६ लाख रुपयांचा 180 हिऱ्यांचा चष्मा फुटला होता. तो दुरुस्तीसाठी त्याने विक्रेत्याच्या माध्यमातूनच जर्मनीला अडीच लाख रुपयांमध्ये पाठविला होता. पोलिसांनी त्याच विक्रेत्याच्या माध्यमातून तो पुन्हा मागवून जप्त केला.
इतर राज्यात संपत्ती, जमीन –
छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यातील आरोपींच्या इतर राज्यात मालमत्ता असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरचा भागीदार आणि सहआरोपी यशोदा शेट्टी, तिचा पती बी. के. जीवन यांनी त्यांच्या कर्नाटकमधील मूळ गावी जमीन खरेदी केली असल्याचं तपासात दिसून आले आहे. आता या प्रकरणातील सहभागी प्रत्येकाच्या नावावरील मालमत्ता पोलिस शोधत आहेत.
बीएमडब्ल्यू कार –
आतापर्यंत हर्षकुमारने बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू बाइकसह ६ वाहने, पाच फ्लॅट, एक रोहाऊस, १ कोटीचे सोने, ४ आयफोनसह १० मोबाइल, आयपॅड, लॅपटॉप आदी १५.५९ कोटींच्या वस्तू खरेदी केल्याचे समोर आले आहे. जगातील सर्वात महागड्या पाच चष्यांपैकी एक हिरेजडित चष्मा हर्षकुमारने खरेदी केल्याचेही समोर आले. आरोपींची जप्त केलेली वाहने छावणी ठाण्यात उभी केली आहे. आता कर्नाटकातील नमस्ते नंतर आणखी कुठे कुठे मालमत्ता खरेदी केली याची चौकशी पोलीस करीत आहेत.