बायको माहेरी गेली, नवऱ्याचा पारा चढला, पेट्रोल टाकून स्वत:ला लावली आग

बिहार :- पत्नी वारंवार माहेरी जात असल्याकारणाने पतीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना बिहारच्या चंपारण जिल्यातील नरकटियागंजच्या शिकारपूर पोलिस स्टेशन हद्दीतील रामपूर गावात घडली आहे. पतीने स्वतःला जाळून घेतलं. नंतर तरुणाला जळताना पाहून त्याच्या सासरच्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच याची माहिती पोलिसांना दिली. तरुणावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तरुणाचे नाव रामबाबू चौधरी (२८) असे आहे. तो बगाहा येथील रहिवासी होता. पोलीस अधिकारी अवनीश कुमार यांनी सांगितले की, पत्नी वारंवार माहेरी जात असल्याकारणाने पती रागावला होता. बुधवारीही नवरा बायकोमध्ये भांडण झालं होतं. नंतर ती तिच्या आई वडिलांच्या घरी गेली होती.
रामबाबू आपल्या पत्नीची नाराजी दूर करण्यासाठी सासरी गेला होता. त्याने आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिला त्याच्यासोबत परत येण्यास सांगितले. परंतु तिने नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून तरुणाने त्याच्या दुचाकीतून पेट्रोल काढले. प्रथम त्याने दुचाकीवर पेट्रोल शिंपडले आणि आग लावली. मग त्याने स्वतःच्या शरीरालाही पेटवून घेतलं.
तरुणाला जळताना पाहताच सासरच्या लोकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.नंतर पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.