मोदी-ट्रम्प यांच्या भेटीनंतर शेअर बाजारात हाय जोश, सेन्सेक्स अन् निफ्टीचं तेजीसह दमदार ओपनिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळत आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे.
भारतीय शेअर बाजार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीमुळं सावरल्याचं चित्र आहे. आज बीएसई सेन्सेक्स 230 अकांच्या तेजीसह 76325 अंकांवर सुरु झाला. तर, एनएसईवर निफ्टी 65 अंकांच्या तेजीसह 23096 अंकांवर खुला झाला आहे.
आशियाई बाजारात देखील नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प भेटीचा परिणाम दिसून आला. गिफ्ट निफ्टी 92 अंकांच्या तेजीसह कारभार करत आहे. आशियाई बाजारपेठांमध्ये देखील तेजी दिसून येत आहे. हँगसँग 509 अंकांच्या तेजीसह खुला झाला आहे. कोस्पी, जकार्ता आणि शांघायच्या बाजारामध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.
सेन्सेक्सवरील 30 शेअर पैकी 18 स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. तर, 12 स्टॉक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. टाटा स्टील 1.40 टक्के, टेक महिंद्रा 0.99 टक्के, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, मारुती, इन्फोसिस, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजी आहे. सन फार्मा, एनटीपीसी, अदानी पोर्टस, पॉवर ग्रिड, एशियन पेंटसमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी असली तरी मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये घसरण सुरु आहे. निफ्टी मिडकॅप इंडेक्स 440 अंकांनी घसरुन 50402 अंकांवर कारभार करतोय. तर, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 214 अंकांच्या घसरणीसह 15753 अंकांवर ट्रेड करत आहे. ऑटो, फार्मा, मिडिया, एनर्जी, इन्फ्राकंझ्युमर ड्यूरेबल्स, ऑइल अँड गॅस क्षेत्रातील स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे.