अचलपूरमध्ये विजेच्या करंटने म्हशीचा मृत्यू, शेतकऱ्यांमध्ये संताप

अचलपूर :- अचलपूरच्या बुंदेलपुरा परिसरात विजेच्या तुटक्या तारा आणि हलगर्जीपणामुळे मोठा प्रकार घडला आहे. शेतकरी लक्ष्मण चंदिले यांच्या शेतात करंट आल्याने एका म्हशीचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, वीज वितरण कंपनीवर गंभीर आरोप होत आहेत. पाहूया हा संपूर्ण अहवाल.
अचलपूर तालुक्यातील बुंदेलपुरा येथे शेतकरी लक्ष्मण चंदिले यांच्या शेतात विजेच्या करंटने एका म्हशीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत काही गुरे बचावली, मात्र वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकरी त्रस्त आहेत.
गावातील अनेक भागात विजेच्या तारा झाडांवर लटकलेल्या आहेत, तुटलेल्या आहेत, किंवा कमी उंचीवर असल्याने शेतकऱ्यांसह जनावरांचे जीव धोक्यात आले आहेत. अनेकदा वीज वितरण विभागाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या घटनेनंतर वीज वितरण कंपनीला त्वरित सूचित करण्यात आले, त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र, यावर त्वरित उपाययोजना न केल्यास शेतकरी आक्रमक पवित्रा घेतील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या या धोकादायक विजेच्या तारा त्वरित दुरुस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तत्काळ पावले उचलली नाहीत, तर भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडू शकतात. आता पाहावे लागेल की, वीज वितरण विभाग या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहतो.