उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली पाचही झोनमधील मालमत्ता कर शिबिराला भेट
अमरावती :- नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे आणि कर भरण्यासंदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने झोनअंतर्गत वॉर्डावॉर्डांत विविध ठिकाणी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
झोननिहाय सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनात या शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांना ऑटो फिरवून कर भरण्यासाठी आवाहनही करण्यात आले. या शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासाठी झोननिहाय सर्व नागरिकांना कर भरण्यासाठी उद्युक्त केले. मनपा झोनच्या सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनात कर विभागाच्या अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सदर शिबिराला मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी भेट दिली.
मालमत्ता कर मुदतीत भरणा करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून सातत्याने केले जात आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्यासाठी ३१ मार्च,२०२५ हा अंतिम दिवस आहे. सर्व मालमत्ताधारकांनी या मुदतीपूर्वी मालमत्ता करभरणा न केल्यास संबंधित मालमत्ताधारकांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. मालमत्ताधारकांनी ठरलेल्या मुदतीत करभरणा करावा, यासाठी महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने व्यापक जनजागृती केली जात आहे. मालमत्ताधारकाच्या सोयीसाठी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही विभाग (वॉर्ड) कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तसेच यासंबंधित अडचणींचा निपटारा करण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करुन दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून केले जाते आहे.