नितेश राणे म्हणाले, माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय; पवार गटाचे पुण्यात बॅनर, सत्तेचा एवढा माज बरा नव्हे.

पुणे : भाजप नेते व मत्स्यपालन आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात पुण्यात बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याने पोस्टर लावल्याचे समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असल्याने त्यानिमित्ताने बॅनर लावण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या सरपंचाला निधी न देण्याबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी शरद पवार गटाच्या नेत्याने राणेंना धारेवर धरलं आहे. असले गलिच्छ राजकारण कधीही महाराष्ट्रात झाले नाही पण आज एक जबाबदार मंत्री भर सभेत असले वक्तव्य करतो, हे निंदनीय असल्याचे म्हटले आहे
बॅनरवरील मजकूर काय?
काल मंत्री नितेश राणे यांनी एका कार्यक्रमामध्ये असे वक्तव्य केले की सरकारचा कोणताही निधी हा फक्त महायुतीच्या कार्यकर्त्याला मिळेल. महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा सरपंचला निधी मिळणार नाही. विकास होणार नाही. विकास करायचा असेल तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. भले मी कोणाला धमकी देईन, माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय, त्यामुळे मला काही फरक पडत नाही.
मंत्रीसाहेब सत्तेचा एवढा माज बरा नव्हे…
मुख्यमंत्री महोदय हाच आहे का निःपक्षपातीपणा….
शरद पवार गटाची टीका
आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरुड अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या वतीने कोथरूडमध्ये ठिकठिकाणी फलक लावून मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या वेळी गिरीश गुरनानी म्हणाले, की सत्ता येते जाते पण सत्तेचा एवढा माज कधी कोणी केला नाही
एखादा विरोधी पक्षाचा आमदार किंवा सरपंच स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी मंत्र्यांना निधी मागत नाही, तो आपल्या गावाच्या किंवा विभागाच्या लोकांच्या विकासासाठी निधी मागत असतो. असले गलिच्छ राजकारण कधीही महाराष्ट्रात झाले नाही पण आज एक जबाबदार मंत्री भर सभेत असले वक्तव्य करतो हे निंदनीय आहे, असेही गुरनानी म्हणाले.