आशापुरी सोनार महिला मंडळ व श्री संत नरहरी सेवा समितीच्या वतीने संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव थाटात संपन्न

अमरावती :- आशापुरी सोनार महिला मंडळ व श्री संत नरहरी सेवा समितीच्या वतीने संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. जुनिकोतवाली भाजी बाजार परिसरात शोभायात्रेच्या माध्यमातून भक्तीमय वातावरण निर्माण झाले. या सोहळ्यात समाजातील मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर भाविकांनी सहभाग नोंदवला. पाहूया सविस्तर रिपोर्ट.
संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेच्या प्रारंभी चांदीच्या पादुकांचे समाजातील दाम्पत्याच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. या वेळी महिला मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष संगीताताई खडेकर, सचिव कुंदाताई अनासाने, सहसचिव अर्चना मुरोडकर आणि कोषाध्यक्ष सरिताताई गौड उपस्थित होत्या. तसेच पुरुष कार्यकारिणीचे अध्यक्ष ओंकारराव अनासाने, उपाध्यक्ष दीपकराव गुरुमाळे, सचिव विलासराव अनासाने, कोषाध्यक्ष सचिनराव मरोळकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन भव्य स्वरूपात केले.
शोभायात्रेत बँड पथक, दिंडी, पालखी, तुळजाभवानी घोडे, पताका आणि महिलांच्या टाळ-भजन सादरीकरणाने धार्मिक वातावरण अधिक भक्तिमय झाले. महिलांनी हिरव्या साड्या आणि भगवे फेटे परिधान करून शोभायात्रेची भव्यता वाढवली.
यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, खोलापुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाथरे साहेब यांनी लहान मुलांना मार्गदर्शन करून त्यांना प्रेरणा दिली. लहान बालकांनी अध्यात्मिक वेशभूषेत विविध सादरीकरण केले.
शोभायात्रेदरम्यान मार्गावर विविध ठिकाणी पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले. श्रद्धाळूंना शरबत व आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा समारोप महाआरती व महाप्रसादाने करण्यात आला. महिला आणि पुरुष भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य शोभायात्रा, धार्मिक सादरीकरण आणि समाजातील उत्स्फूर्त सहभागामुळे या सोहळ्याची भक्तिमय पर्वणी झाली. भविष्यातही अशीच एकात्मता व धार्मिक उत्सव साजरे होवोत.