एसटी महामंडळाचा हलगर्जीपणा – प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच!

अमरावती-नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या शिवशाही बसच्या प्रवाशांसाठी हा एक अत्यंत धक्कादायक अनुभव ठरला. प्रवासादरम्यान अचानक बसचं पुढचं टायर निघाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या देखभालीच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अमरावतीवरून नागपूरकडे निघालेली भरधाव शिवशाही एसटी बस अचानक थांबली आणि प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. कारण, गाडीचं पुढचं टायर आपोआप सुटून लांब जाऊन पडले. घटनेच्या वेळी बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. यामुळे एसटी महामंडळाच्या देखभालीच्या व्यवस्थेवर जोरदार टीका होत आहे. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार परतवाडा आगाराच्या बससोबतही घडला होता. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसच्या देखभालीत हलगर्जीपणा होत आहे का? आणि प्रवाशांचा जीव धोक्यात का टाकला जात आहे? असा सवाल आता उपस्थित होतोय.
एसटी महामंडळाच्या बसची अशीच दुरवस्था सुरू राहिली, तर प्रवाशांच्या सुरक्षेचं काय?
सुदैवाने मोठा अपघात टळला असला तरी, प्रवाशांनी मृत्यूच्या दारातून सुटकेचा अनुभव घेतला.
या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे एसटी महामंडळाच्या देखभाल-दुरुस्ती व्यवस्थेवर गंभीर आरोप होत आहेत.
सरकारी प्रवासी वाहन कितपत सुरक्षित आहे? हा प्रश्न आता प्रवाशांच्या मनात निर्माण झालाय. एसटी महामंडळाला आता देखभाल-दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
या संपूर्ण प्रकरणावर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती घेऊन येत आहेत. पाहत राहा CITY NEWS