कोळसा तंदूर भट्टींवर बंदी, नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना आता तंदूर रोटी बनवण्यासाठी तंदूर कोळसा भट्टीचा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तुम्ही तंदूर रोटी खात असाल आणि तुम्हाला तंदूर रोटी आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई महापालिकेने तंदूर कोळसा भट्टींवर बंदी घातल्याने तंदूर रोटी मिळणार नाही, असं होणार नाही. मुंबई महापालिकेने कोळसा भट्टी ऐवजी वेगळा पर्याय विविध हॉटेल मालक आणि चालकांना सूचवला आहे. खरंतर मुंबई हायकोर्टानेच याबाबत आदेश दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून याबाबत कारवाई केली जात आहे.
महापालिकेने सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना रितसर नोटीस पाठवत याबाबत आदेश दिले आहे. महापालिकेच्या या कारवाईवर काही हॉटेल मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोळसा भट्टी बंद केल्याने तंदूर रोटीच्या चवीत बदल होईल, असं काहीचं म्हणणं आहे. असं असलं तरी कोर्टाच्या आदेशानुसार आता तंदूर कोळसा भट्टी वापरण्यास मज्जावच असणार आहे.
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून कोळसा आणि लाकडी ओवनवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेने कोळसा तंदूर भट्टी वापरणारे रेस्टॉरंट, हॉटेल्सला आणि ढाब्यांना नोटीस बजावली आहे. किचनमध्ये कोळसा भट्टी ऐवजी इलेक्ट्रिकल उपकरणं, सीएनजी, पीएनजी, एलपीजी इंधनाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना कोळसा तंदूर भट्टीवरील तंदूर रोटी खाण्याचा आनंद घेता येणार नाही.
मुंबई महापालिकांनी हॉटेल चालकांना 7 जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टींना इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये बदलण्याची सूचना दिली आहे. या निर्णयाचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात परवाना रद्द करण्यापर्यंत कारवाई केली जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता हॉटेल मालकांना मुंबई महापालिकेचे आदेश पाळण्याशिवाय पर्याय नाही