जयंती साजरी करून घरी परतत असलेल्या युवकाचा चिरडून मृत्यू

यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संत सेवालाल जयंतीनिमित्त उत्सव साजरा करून घरी परतणाऱ्या युवकाचा भरधाव बोलेरो वाहनाने चिरडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला आहे. या घटनेवर राज्यमंत्री इंद्रणील नाईक यांनी थेट पोलिसांना धारेवर धरले आहे. पाहुयात सविस्तर रिपोर्ट.
यवतमाळ जिल्ह्यातील संत सेवालाल जयंतीनंतर गोपाल अशोक जाधव हा युवक घरी परतत असताना भरधाव बोलेरो वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली.
मृतकाच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर लाठीचार्जचा आरोप केला आहे. संतप्त नागरिकांनी दिग्रस महामार्ग रोखून धरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री इंद्रणील नाईक सपत्नीक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना कडक शब्दांत सुनावले.
राज्यमंत्री नाईक यांना माहिती मिळाली की, अपघातातील बोलेरो वाहन पोलीस सोडणार आहेत. यावर त्यांनी संताप व्यक्त करत, “जर वाहन सोडले, तर मी पोलिसांना सोडणार नाही. मी पोलिसांचा नाही, तर जनतेचा नेता आहे!” असे ठणकावले.
यवतमाळमध्ये या अपघातामुळे संतप्त झालेल्या जनतेचा रोष पाहायला मिळत आहे. राज्यमंत्री इंद्रणील नाईक यांनी थेट पोलिसांना धारेवर धरल्याने हा विषय अजून चिघळण्याची शक्यता आहे. पुढील अपडेटसाठी बघत राहा CITY NEWS