नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा गुदमरून मृत्यू, १२ जखमी

नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर कुंभला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी क्षमतेपेक्षा जास्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे प्रवासी प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांची वाट पाहत होते. १२ गंभीर जखमींवर दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ९ महिला, ४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये बिहारमधील ९, दिल्लीतील ८ आणि हरियाणातील एका व्यक्तीचा समावेश आहे.
प्रयागराजला जाण्यासाठी गाडी पकडण्यासाठी रेल्वे स्थानकात मोठी गर्दी उसळली होती. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली आणि गर्दी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे वळली. त्यातच चेंगराचेंगरी झाली.
स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली आणि त्यात अनेक प्रवाशी गुदमरल्याने बेशुद्ध झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर, पोलिस उपायुक्त (रेल्वे) यांनी अधिकृत निवेदनात सांगितले की, प्रयागराज एक्स्प्रेस गाडी निघण्याची वाट पाहत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर आधीच मोठी गर्दी होती. त्यात स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या आणि या गाड्यांचे प्रवासीही प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३ आणि १४ वर देखील उपस्थित होते. तेव्हा रात्री ९.५५ च्या सुमारास चेंगराचेंगरी झाली, त्यानंतर अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करावी लागली.
चेंगराचेंगरीत आई गमावलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, आम्ही बिहारमधील छपरा येथे जात होतो जिथे आमचे घर आहे. आम्ही एका ग्रूपमध्ये होतो. लोक एकमेकांना ढकलत होते. या गोंधळात आणि चेंगराचेंगरीत माझ्या आईचा मृत्यू झाला. माझ्या आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माझ्या आईचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. कुटुंबातील एक महिलाही बेशुद्ध पडली.
दिल्ली अग्निशमन सेवेचे (डीएफएस) प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बचाव पथके आणि चार फायर इंजिन पाठवले आहेत. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) हिमांशू उपाध्याय यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, प्रवाशांनी एकमेकांना ढकलले, त्यामुळे काही जण जखमी झाले.