बडनेरा रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिक

अमरावती :- बडनेरा अमरावती महामार्गावर असलेला बडनेरा रेल्वे उड्डाण पूल गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण स्थितीत आहे. रुंदीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे या अरुंद पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा भीषण ट्रॅफिक जॅम पाहायला मिळाला. या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. नागरिक संतप्त असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बडनेरा रेल्वे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्याने वाहतुकीचा ताण वाढला आहे. शनिवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना भीषण ट्रॅफिक जॅमला सामोरे जावे लागले. पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. विशेष म्हणजे, या जॅममध्ये एका रुग्णवाहिकेचा अडथळा निर्माण झाल्याने रुग्णाचा जीव टांगणीला लागला होता.
वाहतुकीची वर्दळ जास्त असल्याने आणि पोलिसांकडून योग्य नियोजन न झाल्यामुळे हा प्रकार वारंवार घडत आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान वाहतूक पोलिसांची तैनाती करण्याची मागणी केली आहे. मात्र, अमरावती वाहतूक पोलिसांकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.
बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण आणि वाहतूक शाखेचे अंमलदार ललित देवकर यांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अपूर्ण पुलामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाहतूक नियम पायदळी तुडवले जात आहेत, पोलिसांची भिती नाही आणि नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव!
अमरावती शहरात वाहतुकीचा बोजवारा उडालाय, आणि याला जबाबदार कोण? प्रशासन, वाहतूक पोलीस, की नागरिक स्वतः?
वाहनचालक मनमानी करतायत, वाहतूक पोलिसांकडे पुरेसा मनुष्यबळ नाही आणि शासनाचा दुर्लक्ष्यभाव देखील यामागील मोठा कारण आहे.
अमरावतीतील वाहतूक पोलिसांकडे कर्तव्य बजावण्यासाठी इच्छाशक्ती जागृत करण्याची गरज आहे. वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
अमरावती वाहतूक पोलिसांनी आता झोपेतून जागं होण्याची वेळ आली आहे! नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि नागरिकांमध्ये अधिक जनजागृती होणं गरजेचं आहे.