अमरावती जिल्हा कृषी कार्यालयाजवळ ट्रेनिंग हॉलला भीषण आग

अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या ट्रेनिंग हॉलमध्ये रविवारी संध्याकाळी भीषण आग लागली.या आगीत महत्त्वाचे दस्तऐवज, प्रोजेक्टर आणि अन्य सामग्री जळून खाक झाली असून, प्रशासनावर मोठा आर्थिक फटका बसला आहे.आगीचे कारण नेमके काय? आणि त्याचा परिणाम काय होणार? याचा सविस्तर आढावा घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये!
अमरावती जिल्ह्यातील जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या ट्रेनिंग हॉलमध्ये संध्याकाळी अचानक भीषण आग लागली.
आग इतकी तीव्र होती की, हॉलच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि आतील सर्व सामग्री जळून खाक झाली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तातडीने गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे एकूण ७ ते ८ गाड्यांची मदत घ्यावी लागली.
प्राथमिक तपासणीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या आगीत कृषी विभागाचे अनेक महत्त्वाचे दस्तऐवज, रेकॉर्ड, प्रोजेक्टर, आणि कॉटन बॅग जळून नष्ट झाल्या आहेत.जिल्हा कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले की, या आगीमुळे विभागाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
सध्या अग्निशमन दल घटनास्थळी असून, आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तसेच, प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये अमरावती शहरात भीषण आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत.ही शहरातील ८ वी मोठी आग असून, बहुतांश आगी शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे.यामुळे विजेच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या घटनेनंतर प्रशासन शॉर्ट सर्किट आणि आगींच्या घटनांवर अधिक नियंत्रण आणण्यासाठी कोणते उपाय करणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
अमरावती जिल्ह्यात ट्रेनिंग हॉलला लागलेल्या या भीषण आगीमुळे कृषी विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.ही ८ वी मोठी आग असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील का? याची स्पष्टता लवकरच होईल. अद्यावत माहितीसाठी आमच्यासोबत राहा!