अमरावती भूषण पुरस्कार 2025 सोहळा संपन्न

अमरावती :- समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अमरावतीच्या 50 मान्यवरांना ‘अमरावती भूषण 2025’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लाइफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यात अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना विशेष गौरव करण्यात आला. चला, पाहुया या दिमाखदार सोहळ्याचा संपूर्ण अहवाल!
अमरावती जिल्ह्यात समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करण्याचे अत्यंत कौतुकास्पद काम लाइफ डेव्हलपमेंट सोसायटीने केले आहे. शनिवारी ऍनिमेशन कॉलेज येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सहायक सल्लागार मनोज वाडेकर, अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉ. चंदू सोजतीया, उद्योजक कैलास गिरोळकर, समाजसेवक सलीम मीरावाले आणि सिटी न्यूजचे उपसंपादक अजय श्रुंगारे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना ‘अमरावती भूषण 2025’ पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या मनोगतात ते म्हणाले की,
“अमरावती जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचे योग्य सन्मान होणे आवश्यक आहे. अनेक लोक उत्कृष्ट काम करतात, मात्र त्यांना ओळख मिळत नाही. लाइफ डेव्हलपमेंट सोसायटीने असे व्यक्ती सन्मानित करून कौतुकास्पद कार्य केले आहे.”
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनीही अमरावतीकरांच्या कार्याची स्तुती केली. ते म्हणाले,
“मी अनेक ठिकाणी सेवा बजावली, पण अमरावतीतील जनतेसारखे कार्यकर्ते कुठेही पाहायला मिळाले नाहीत. अशा समाजसेवकांचा सन्मान करणे ही आमची जबाबदारी आहे.”
या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्वेत गुळदेवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या सन्मानपत्राचे वाचन प्रा. अनंत नांदूरकर यांनी केले.
सन्मानित मान्यवरांमध्ये विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता. मुद्रित माध्यम पत्रकारिता क्षेत्रातून ‘लोकमत हिंदी समाचार’चे प्रतिनिधी नासिर हुसेन, ‘आज तक’चे जिल्हा प्रतिनिधी धनंजय साबळे, ‘झी 24 तास’चे अनिरुद्ध दवाळे, ‘पुढारी’चे जिल्हा प्रतिनिधी छगन जाधव यांना पुरस्कार देण्यात आला.पोलीस क्षेत्रातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, पोलीस निरीक्षक रिता उईके आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका कोठेवार यांना सन्मानित करण्यात आले.
तर, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. सतीश डहाके, डॉ. गुणवंत डहाके, तसेच हरिना फाऊंडेशनचे मनोज राठी यांच्यासह एकूण 50 मान्यवरांना ‘अमरावती भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.लाइफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या या उपक्रमाने अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली असून, पुढील काळातही असेच उपक्रम राबवण्यात येतील, असे आयोजकांनी सांगितले.
अमरावती भूषण पुरस्कार 2025 सोहळा हा फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर समाजासाठी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता. अशाच सामाजिक बांधिलकीला बळ देणाऱ्या बातम्यांसाठी पाहत राहा CITY NEWS ! धन्यवाद!