सुपारी देऊन हत्येचा कट, पारडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक

नागपूर :- शहरात खळबळजनक गुन्हा! पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुपारी देऊन हत्येचा प्रयत्न उघडकीस आला आहे. एका लॉन मालकाने एका व्यक्तीच्या जीवावर उठत एक लाख रुपयांची सुपारी दिली आणि दोन तरुणांना कट रचून हत्येचे आदेश दिले. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट फसला आणि आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणात मोठ्या आर्थिक देवाण-घेवाणीचा प्रकार उघड होतोय. काय आहे संपूर्ण प्रकरण? पाहूया ही विशेष बातमी!
पारडी परिसरात विजय भांडेकर नावाच्या व्यक्तीवर कोयत्याने वार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तपासात धक्कादायक बाब समोर आली की, हा हल्ला एका लॉन मालकाने करवून घेतला होता. या कटासाठी तब्बल एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. मात्र मुख्य सूत्रधार असलेला लॉन मालक फरार असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. याशिवाय, या प्रकरणात एका पोलीस हवालदाराच्या मध्यस्थीमुळे मोठ्या रकमेचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काही पोलिस अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. सध्या गुन्हे शाखाही या प्रकरणाची सखोल तपासणी करत आहे. पुढे या प्रकरणात कोणते धक्कादायक खुलासे होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!
या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सुपारी देऊन हत्या करण्याचा प्रकार आणि त्यात पोलिसांवर होणारे संशयाचे सावट या प्रकरणाला आणखी गंभीर बनवत आहे. आता या गुन्ह्यात कोणता नवा खुलासा होतो, कोणाची गच्छंती होते आणि न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा!