आसेगाव पूर्णा नदीतून सर्रास रेती तस्करी! प्रशासन डोळेझाक करतंय?

अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा नदीतून सर्रास बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून, यात प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी बळवंत रखराव आणि तहसीलदार डॉ. संजय घरकल यांच्याकडे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. पाहूया हा संपूर्ण अहवाल.
आचलपूर तालुक्यातील आसेगाव पूर्णा नदीतून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वाळूचा अधिकृत लिलाव न झालेल्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिवस-रात्र रेतीची तस्करी सुरू असून, हे सर्व काही प्रशासनाच्या डोळ्यासमोर घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी लक्ष्मणराव पोटे हे तस्करांना मूकसंमती देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वाळू तस्करांचा दावा आहे की, ते सत्ताधारी आमदारांचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनावरील संशय अधिक वाढत आहे. ग्रामस्थांनी शासनाला इशारा दिला आहे की, जर लवकरच या वाळू तस्करांवर कठोर कारवाई झाली नाही, तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल.
आसेगाव पूर्णा नदीत सुरू असलेल्या या वाळू तस्करीबाबत प्रशासन काही पावले उचलणार का? की याकडे डोळेझाक केली जाईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शासनाने जर यात लक्ष घातलं नाही, तर स्थानिक जनतेचा रोष अधिक वाढण्याची शक्यता आहे. आपण पाहत राहा City News Amravati