चोरीचा ४ लाख ८५ हजारांचा लसूण जप्त; जळगावात पोलिसांनी मोठी कारवाई

जळगाव :- जळगाव एमआयडीसी हद्दीतील सुप्रीम कॉलनीत एका बंद बेकरीत चोरून आणलेला लसूण ठेवण्यात आलेला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत नागपूरमधून चोरलेला हा ४ लाख ८५ हजार रुपये किमतीचा लसूण जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव एमआयडीसी परिसरातील सुप्रीम कॉलनीतील साहित्या नगर येथे बेकरी बंद होती. या बंद बेकरीत नागपूर येथून चोरून आणलेल्या लसणाच्या गोण्या ठेवण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार एमआयडीसी पोलिसांचे पथकाने शोधकार्य सुरू केल्यावर बंद बेकरीमध्ये ९७ लसणाच्या गोण्या आढळून आल्या. त्याची बाजारभाव किमत रुपये ४ लाख ८५ हजार आहे.
मालाची बिले नसल्याने लसूण जप्त
दरम्यान बेकरीमालक ईश्वर राठोड यास याबाबत विचारणा करण्यात केली असता त्यांचा चुलत भाऊ विनोद गणेश रुढे (रा. सुप्रीम कॉलनी) याने या लसणाच्या गोण्यांचा माल विकत आणल्याचे सांगितले. परंतु माल खरेदीबाबत कोणतीही बिले त्यांच्याकडे आढळून आली नसून फक्त लसूण साठविण्यासाठी बेकरीत ठेवला आहे. त्यामुळे या सर्व मालाची बिले नसल्याने मालाच्या मालकीबाबत संशय बळावल्याने एमआयडीसी पोलिसांनी सर्व माल जप्त केला. संशयित विनोद रुढे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्री होण्याआधीच माल जप्त
सदरच्या मालासंदर्भात अधिक तपास करता श्याम रमेश मनवाणी (रा. नागपूर) यांच्या टाटा ओनियन कंपनी नागपूर येथील माल असून हा लसूण नागपूर येथून बुखारो-रांची या ठिकाणी पोचविण्यासाठी टेम्पोचालक विनोद रुढे याच्याकडे ताब्यात दिला होता. परंतु विनोदने या मालाची पोहोच न करता लंपास केला. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार मालाची विल्हेवाट लागण्याअगोदरच एमआयडीसी पोलीसांनी सर्व माल जप्त केला आहे. हा संपूर्ण माल श्याम मनवाणी यांच्या ताब्यात देण्यात आला.