जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनीचा समारोप शेतकऱ्यांचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचले – खासदार बळवंत वानखेडे
अमरावती :- जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनीच्या माध्यमातून इतर ठिकाणची पिके, नवतंत्रज्ञान यासोबतच शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे प्रदर्शनीचा उद्देश सफल झाला असून प्रदर्शन फलदायी ठरले आहे, असे मत खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केले.
जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनीचा समारोप मंगळवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील सोसे, प्राचार्य अनिल ठाकरे, हरिभाऊ मोहोड, राजीव ठाकूर, विनय बोथरा आदी उपस्थित होते.
खासदार श्री. वानखेडे यांनी, प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इतर ठिकाणी पिके पहावयास मिळाली. तसेच उत्पादनावर प्रक्रिया करून स्वत: माल विकण्याची संधी प्रदर्शनीच्या माध्यमातून मिळाली. याठिकाणी शेतीमध्ये बदलत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे हे प्रदर्शन झाले असल्याचे सांगितले.
श्री. लहाळे यांनी, प्रदर्शनीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भेटी दिल्या. त्यामुळे वितरकही समाधानी झाले. शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादनाचे स्वत: मार्केटींग करून यशस्वी व्हावे, असे आवाहन केले. श्रीमती निस्ताने यांनी 288 स्टॉलच्या माध्यमातून 381 शेतकऱ्यांनी प्रदर्शनीत सहभाग नोंदविला. 50 हजार नागरिकांनी भेटी दिल्या, तर 70 लाखांची उलाढाल झाली असल्याचे सांगितले.
सुरवतीला पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. ड्रोन पायलट निमिका सुरेश दोडी, पाकसाड काटपिडीया, अमित जयसिंगपूरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आर. आर. पठाण यांच्या शेतीमातीच्या कथा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रदर्शनीमध्ये सहभागींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. निलेश राठोड यांनी सूत्रसंचालन केले.