महाराष्ट्र आरोग्य मित्रांचा बेमुदत धरणे आंदोलन!

महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने आपल्या हक्कांसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आरोग्य मित्रांना नियमित वेतन, जॉइनिंग लेटर, आणि किमान वेतन कायद्यानुसार भत्त्यांची मागणी आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे नेमके म्हणणे काय आहे? पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट!
महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना, जी CITU संलग्न आहे, त्यांनी आपले विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात प्रमुख मागण्या पुढे आणण्यात आल्या आहेत – आरोग्य मित्रांना २६,००० रुपये मासिक वेतन मिळावे, महागाई भत्ता लागू करावा, आणि दरवर्षी १०% वेतनवाढ मिळावी. तसेच, आरोग्य मित्रांना १० किरकोळ रजा, १० विशेष अधिकार रजा, आणि ३० सणाच्या सुट्ट्या लागू कराव्यात, अशीही संघटनेची भूमिका आहे.
याशिवाय, सध्या वापरण्यात येणाऱ्या एप्रोनऐवजी फॉर्मल ड्रेस लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, ESIC मधील त्रुटी दूर करून लवकरात लवकर सर्व आरोग्य मित्रांना ESIC कार्ड मिळावे, अशीही मागणी आहे. विशेष म्हणजे, २०१८ पासून आरोग्य मित्र विनावेतन सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्यांना जॉइनिंग लेटरसह योग्य मोबदला द्यावा आणि त्यावर ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ असा स्पष्ट उल्लेख असावा, अशी आग्रही मागणी संघटनेने केली आहे.
महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आता पाहायचं की प्रशासन यावर काय भूमिका घेते.