शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच, सरकार गप्प का?

शेतकऱ्यांचा घात…. सरकारचा विश्वासघात! 30 हजार कोटींचं थकीत कर्ज, 15 लाखांहून अधिक शेतकरी आर्थिक संकटात, पण सरकार गप्प का? कर्जबाजारीपणाच्या खाईत शेतकरी, आत्महत्यांचे सत्र सुरूच, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं?
महाराष्ट्रातील 1 कोटी 31 लाख शेतकऱ्यांपैकी तब्बल 15 लाख 46 हजार शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत. राज्यातील बँकर्स कमिटीच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.तब्बल 30 हजार 415 कोटी रुपयांचं कर्ज थकित आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी आर्थिक गर्तेत सापडलेत,कारण त्यांना हमीभाव मिळत नाही, कधी नैसर्गिक आपत्ती संकटं आणतात, पण सरकार मात्र केवळ घोषणा करत राहतं!
महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्ही सरकारांनी कर्जमाफीची मोठमोठी आश्वासनं दिली.महायुतीने सातबारा कोरा करू असं वचन दिलं, तर महाविकास आघाडीने 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ असं सांगितलं.पण आजही हजारो शेतकरी थकित कर्जाच्या ओझ्याखाली चिरडले जात आहेत.
रोज सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करतात. वर्षाला 2000 हून अधिक शेतकरी मृत्यूला कवटाळतात.पण सरकारला याची काहीही फिकीर नाही. लाडक्या बहिणींसाठी 48 हजार कोटींची तरतूद केली जाते,पण शेतकऱ्यांसाठी मदतीचा एक पैसाही देताना सरकारचे हात का आखडतात?17 जिल्ह्यांत शेतीकर्ज थकित आहे, लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी गहाण ठेवाव्या लागतात,पण निवडणुकीत मतांसाठी मात्र हेच शेतकरी आठवतात!
आमचा सरकारला प्रश्न आहे, शेतकऱ्यांची 30 हजार कोटींची थकीत कर्जे सरकार कधी माफ करणार?
निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं कुठे गेली? शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या?
नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई का मिळत नाही? सातबारा कोरा करण्याचं आश्वासन फक्त दिखावा होतं का?
महाराष्ट्रातील शेतकरी संपत चालला आहे! कर्जाच्या विळख्यात अडकलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्विकारतात, पण सरकारला जाग येत नाही. निवडणुका आल्या की मतांसाठी धावणारे हे नेते आता कुठे आहेत? सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही!