४ वर्षांच्या मुलीनं कागदावर चित्र रेखाटलं, आईचा मारेकरी सापडला; नराधम बापाचा खेळ खल्लास

उत्तरप्रदेश :- झाशीच्या कोतवाली परिसरातील शिव परिवार कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. नंतर मृतदेह पंख्याला लटकवून आत्महत्येचा बनाव रचला. मात्र, मुलीने काढलेल्या चित्रामुळे वडीलांनीच आईची गळा दाबून हत्या केल्याचं उघड झालं. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
झाशीच्या लिधुरा येथील सोनाली हिचे लग्न ६ वर्षांपूर्वी संदीप बुधौलियाशी झाले होते. कोतवाली परिसरातील शिव परिवार कॉलनीत तिचं सासर होतं. सोमवारी सासरच्या मंडळींनी सोनालीच्या वडिलांना फोन केला होता. सोनालीने आत्महत्या केली असल्याचं त्यांनी सांगितलं. नंतर सोनालीच्या मुलीने सांगितले की, आईला आधी मारहाण केली, नंतर गळा दाबून हत्या केली आणि सोनालीनं आत्महत्या केली असल्याचा बनाव रचला. आईसोबत घडलेली घटना मुलीने पेपरवर चित्र काढून रेखाटली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या कुटुंबियांनी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह नेण्यास परवानागी देण्यास नकार दिला. पोलिसांनी सोनालीच्या माहेरच्या मंडळींना समजावून सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.
हुंडा आणि हत्येचा गुन्हा दाखल
सिटी कोतावालीचे प्रभारी निरीक्षक शैलेंद्र कुमार सिंह म्हणाले की, मृताचे वडील संजीव त्रिपाठी यांच्या तक्रारीवरून पती संदीप, सासू विनिता, मेहुणा कृष्णकुमार आणि मेहुणी मनीषा यांच्यासह ४-५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.