अमरावतीत राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ!

अमरावती :- अमरावतीमध्ये क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! स्वाभिमान महोत्सवाच्या निमित्ताने सर्वज्ञ फाउंडेशन अमरावती आणि अमरावती टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा मैदानावर रंगलेल्या या भव्य स्पर्धेचे उद्घाटन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त सचिन कलंत्री आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते पार पडले.
19 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात विशेष क्षण पाहायला मिळाले, जेव्हा आमदार रवी राणा यांनी बॅटिंग केली आणि पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्यांच्यासमोर बॉलिंग केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील पहिला सामना अमरावती आणि नागपूर संघांमध्ये रंगला, ज्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत राज्यभरातून क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला असून, विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक ₹4 लाख व ट्रॉफी, तर द्वितीय पारितोषिक ₹2 लाख व ट्रॉफी असेल. या स्पर्धेसाठी क्रिकेट चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी दसरा मैदानावर मोठी गर्दी पाहायला मिळाली.
राज्यभरातील क्रिकेटपटूंना एक मोठे व्यासपीठ देणारी ही स्पर्धा पुढील काही दिवस रंगतदार ठरणार आहे. खेळाडूंचा उत्साह आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता अमरावतीतील क्रिकेटप्रेमींना या सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. पुढील सामन्यांसाठी आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. पाहत राहा CITY NEWS सोबत!