ऑनलाइन सट्टेबाजी गिरोह पकडला, अकोल्यातील प्रसिद्ध हॉटेल मालक अटकेत!

अकोला :- क्रिकेट, फुटबॉल, टेनिस यांसारख्या खेळांवर मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 33 आरोपींना अटक करण्यात आली असून, यात अकोल्यातील प्रसिद्ध वैभव हॉटेलच्या मालकाचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. एकूण 28 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील एका फार्म हाऊसमध्ये क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि कॅसिनो गेम्सवर अवैध ऑनलाइन सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात डिजिटल पुरावे आणि रोख रक्कम हस्तगत केली. आरोपी वेब ऍप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून पैशांच्या देवाणघेवाणीत गुंतले होते.
या रॅकेटमध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध शहरांतील आरोपी सामील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी 12 लॅपटॉप, 113 मोबाईल फोन, 10 बँक पासबुक, 13 एटीएम कार्ड आणि इंटरनेट राऊटर्ससह विविध साहित्य जप्त केले आहे. तसेच 9.92 लाखांची बँक खाती फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या मोठ्या कारवाईत अकोला पोलिसांनी रविंद्र विष्णुपंत पांडे, संजय गुप्ता, मोनीश गुप्ता, निरंजन गुप्ता आणि अन्य आरोपींना ताब्यात घेतले असून, काही मुख्य सूत्रधार फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, आरोपींवर भारतीय न्यायसंहिता कलम 318(4), 112(2), 3(5) आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आंतरराज्यीय गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई केली असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. पाहत राहा city News सोबत, आम्ही तुम्हाला देत राहू सर्व ताज्या अपडेट्स!