नदीवर पाणी आणायला गेलेल्या सात वर्षांच्या मुलाचा सिंहाने घेतला जीव

गुजरात :- सिंहाच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुजरातमधील अमरेली येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहाने एका मुलावर हल्ला करून त्याला फाडून खाल्ले. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील एक कुटुंब अमरेलीच्या पानिया गावात बाभळीची झाडे तोडत होते. त्यादरम्यान त्यांची तीन मुले पाणी आणण्यासाठी जवळच्या नदीवर गेली होती. दरम्यान, अचानक तिथे सिंहाची गर्जना ऐकू आली. त्यामुळे दोन मुले घाबरुन आपला जीव वाचवून पळून गेली. पण सिंहाने एका मुलाला पकडले. आणि त्याला फरफटत झाडीत नेले. सिंहाने मुलाचे लचके तोडले. जेव्हा कुटुंबातील सदस्य मुलाला वाचवण्यासाठी आले तेव्हा त्यांना मुलाचे फक्त डोके, पाय आणि काही हाडे आढळली.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्येही अमरेलीच्या जिक्काद्री गावात एका पाच वर्षांच्या मुलावर सिंहाने हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली होती. यानंतर सिंहाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. वन विभागाने सांगितले की घटनेची माहिती मिळाल्यानंतर, आमच्या टीमने २ तासांच्या आत सिंहाला पकडून क्रँकाच अॅनिमल केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे, जिथे त्याची तपासणी केली जाईल.
माणसांवरील हल्ल्यामुळे त्याची चाचणी केली जाईल आणि तो बरा होईपर्यंत त्याला प्राण्यांच्या केअर सेंटर मध्ये ठेवले जाईल. सिंहाच्या हल्ल्यात दगावलेल्या मुलाचे नाव राहुल बारिया असून तो ७ वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचे वडील नारू बारिया आणि इतर कामगार बाभळीची झाडे तोडण्यासाठी येथे आले आहेत.
या सिंह बहुल क्षेत्रात हे कामगार झोपड्या बांधतात. आणि उघड्यावर राहतात. रात्रीच्या वेळी परिसरात सिंहांची गर्जना ऐकू येत असतानाही ते सीमेवरून हलले नाहीत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सकाळी राहुल जवळच्या नदीत दोन इतर मुलींसह एका भांड्यात पाणी भरण्यासाठी गेला होता. यावेळी नदीकाठून एक सिंह त्यांची शिकार करण्यासाठी आला. दोन्ही मुली पळून जाण्यात यशस्वी झाल्या, पण सिंहाने राहुलला धरले आणि बाभळीच्या झाडीत घेऊन जाऊन त्याचे तुकडे केले. कुटुंबाने शोध घेतला तेव्हा त्यांना राहुलचे फक्त डोके आणि त्याच्या पायांच्या खालच्या भागाची हाडे सापडली.