पुण्यात मित्रानेच मित्राला संपवलं, कारण ठरली घटस्फोटीत पत्नी; रक्ताने माखलेल्या मोबाईलनं गूढ उकललं

पुणे :- पुण्याच्या आंबेगाव पठार भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यपान केल्यानंतर आपल्या घटस्फ़ोटीत पत्नीबद्दल खालच्या भाषेत कमेंट केल्याच्या रागातून मित्राने मित्रावर पहारीने वार करून त्याचा खून केला आहे. या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. रक्ताने माखलेल्या मोबाईलमुळे आरोपी सापडला आहे.
नयन प्रसाद असे खून झालेल्या मित्राचे नाव असून बीरन सुबल असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. कात्रज परिसरातील आंबेगाव पठार भागात ही घटना घडल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बिरन सुबल आणि नयन प्रसाद दोघे मित्र असून ते पश्चिम बंगाल येथील राहणारे आहेत. पुण्यात ते कामानिमित्त रहात होते. शनिवारी ८ फेब्रुवारीच्या रात्री दोघेही आंबेगाव पठार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत मद्यपान करत बसले होते. मद्य प्राशन केल्यानंतर बिरन सुबल याला त्याची घटस्फोटीत पत्नीची आठवण झाली. त्या नादात त्याने आपल्या घटस्फोटीत पत्नीला फोन लावला. मात्र तिचा फोन उचलला गेला नाही. हे दृश्य पाहून सुबल याचा मित्र नयन प्रसाद याने त्यावर खालच्या भाषेत कमेंट केली. सुबलला या गोष्टीचा राग आला. त्याच रागाच्या भरात हाच राग अनावर झाल्याने बिरण याने ते बसलेल्या ठिकाणी असलेली लोखंडी पहारीने नयन प्रसाद याच्यावर वार केले. सपासप वार झाल्याने नयन याचा जागेवरच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आरोपी बिरेन हा त्याच्या मुळ गावी म्हणजे पश्चिम बंगालमध्ये पळून गेला होता. दोन दिवसांनांतर हा प्रकार समोर आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहुन त्याची ओळख पटवणे अवघड झाले होते. मात्र, त्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेल्या मोबाईमुळे खऱ्या आरोपीपर्यंत पोलिसांना पोहचण्याचा मार्ग सापडला. या मोबाईलच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी आरोपी बिरान सुबल कर्माकर याला पश्चिम बंगालमधील हावडा या ठिकाणी जाऊन बेड्या ठोकल्या आहेत.