LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे उद्घाटन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांचे मुंबईकरांना आमंत्रण

मुंबई :- मुंबईच्या मध्यवर्ती भागी असलेले रवींद्र नाट्यमंदिर आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी पुन्हा नव्याने 28 फेब्रुवारी 2025 पासून नाट्यरसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. या संकुलांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम शिवेंद्रराजे भोसले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता होत आहे. या मुंबईतील अतिशय भव्य आणि सुशोभित असलेल्या नाट्यगृह आणि अकादमीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सर्व मुंबईकरांना येण्याचे आमंत्रण सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून केले आहे.

मंत्रालयात झालेल्या या पत्रकार परिषदेपूर्वी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नवीन बोधचिन्हाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होत्या.

बोधचिन्हाचे अनावरण करतांना लोक कला, अभिजात कला, दृश्यात्मक कला आणि दृकश्राव्य कला अशा सर्व प्रकारच्या कलांचे हक्काचे माहेरघर असलेल्या तसेच नाट्यगृहांची सुविधा देणाऱ्या अकादमीचे प्रतिबिंब असलेले नवे व आकर्षक बोधचिन्ह तयार करण्यात आले असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

पु.ल.देशपांडे कला अकादमीने स्थापनेपासून कलाकार आणि कलाप्रेमीच्या अनेक पिढ्या घडविल्या असल्याचे सांगून मंत्री ॲड शेलार म्हणाले की, या अकादमीमध्ये नवोदित कलाकारांना त्यांची कला दाखवण्याची जशी सोय आहे, त्याचप्रमाणे उपजत कला गुण असलेल्या कलाकारांना त्यांचे कला बळ मिळण्याची सुद्धा अकादमी मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर कला सादरीकरण, कलाशिक्षण, कलाआस्वादन, कलासंवर्धन आणि कलाविषयक रोजगार निर्मिती अशा बहुविध सुविधा अकादमीत एकाच ठिकाणी आता उपलब्ध होणार आहेत. कलाक्षेत्रातील 20 वेगवेगळे प्रमाणपत्र व पदवीका अभ्यासक्रम येथे लवकरच सुरु होणार असून त्याचा फायदा नवोदित कलाकारांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री ॲड शेलार म्हणाले की, संकुलातील रवींद्र नाट्यमंदिर, 2 लघु नाट्यगृह आणि 5 प्रदर्शन दालने तसेच 15 तालीम दालने यांच्यामुळे कलाकारांची कायमच मोठी सोय झाली आहे. त्याचबरोबर आता ही दोन्ही नाट्यगृहे नव्या रूपात, अत्याधुनिक सोयी-सुविधांसह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नाटक आणि मराठी चित्रपट या दोन्हींसाठी आवश्यक अशी अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था व अंतर्गत सजावट करण्यात आली असल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!