LIVE STREAM

Accident NewsLatest NewsMaharashtra

बस- ट्रक्टरचा अपघात; नियंत्रण सुटून बस ३० फूट खड्ड्यात कोसळली, २० प्रवासी जखमी

सांगली :- सांगलीच्या म्हैसाळ येथे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस व ट्रक्टरच्या अपघात झाला. अपघातानंतर कर्नाटक बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात उलटली. या अपघातामध्ये बसमधील २० प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. जखमींना मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जाण्यासाठी मार्गस्थ झाली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास बस मार्गस्थ झाल्यानंतर साडेदहाला सदरचा अपघात झाला. यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रक्टर दोन ट्रेलरसह म्हैसाळच्या दिशेने येत होता. कर्नाटक बसने ट्रक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली. त्यानंतर बस चालकाचा बसवरील ताबा सुटला.

बस थेट खड्ड्यात कोसळली

बसवरील नियंत्रण सुटल्याने कर्नाटक बस अंदाजे ३० फुट उंचीवरून खड्डात कोसळली. अपघातानंतर म्हैसाळ येथील तरूणांनी बस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या बसमधून जवळपास ४० प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात बसमधील वीस प्रवासी जखमी झाले असून जखमींमधील दोन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर १८ प्रवाशांना मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बस चालकाचा पाय मोडला

दरम्यान अपघातात बसचा चालक मात्र बराच वेळ अडकला होता. यात बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे. शर्थीचे प्रयत्न करून बस चालकांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमीवर मिरज येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी,वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटन पोहचले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!