कुंभमेळ्यावरून परतीच्या प्रवासात अपघात – टँकरला कारची जबर धडक

भीषण अपघाताची एक धक्कादायक घटना आर्णी तालुक्यात घडली आहे. कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांची कार टँकरला धडकून एक महिला ठार, तर चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कसा घडला? घटनास्थळी काय परिस्थिती आहे? पाहुयात आमचा हा सविस्तर अहवाल.
आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आर्णी तालुक्यातील सुकळी येथे हा भीषण अपघात घडला. प्रयागराज कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांची कार यवतमाळवरून माहूरच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला मागून धडकली. या अपघातात 67 वर्षीय विमल महामुने यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा राहुल महामुने गंभीर जखमी आहे. इतर दोन महिला आणि एक पुरुष किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून टँकर चालक फरार झाला होता, मात्र आर्णी शहरातील पत्रकार वीरेंद्र पाईकराव यांनी तत्परता दाखवत पोलिसांना माहिती दिली. महामार्ग पोलिसांनी कोसदनी येथील पोलिस चौकीजवळ टँकरला अडवून चालकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जखमींना तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
कुंभमेळ्याहून घरी परतणाऱ्या भाविकांच्या गाडीसोबत घडलेली ही दुर्घटना मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातानंतर महामार्गावरील सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.