यवतमाळच्या पुसदमध्ये माकडांचा उच्छाद! नागरिक त्रस्त

यवतमाळ :- यवतमाळच्या पुसद शहरात माकडांचा धुमाकूळ सुरूच आहे! मोती नगर परिसरातील दत्त मंदिर भागात दोन माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. नागरिकांचे जीवन असह्य झाले असून, घरात घुसून नुकसान केल्याने संतप्त नागरिक प्रशासनाकडे मदतीची याचना करत आहेत. मात्र, वन विभागाकडून केवळ तोंडी आश्वासनच मिळत असल्याचा आरोप होत आहे.
पुसद शहरातील मोती नगर भागातील नागरिक माकडांच्या हैदोसाने हैराण झाले आहेत. घरात घुसून अन्नधान्याची नासधूस आणि वस्त्रांची तोडफोड सुरू असून, अनेक कुटुंबांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. वन विभागाकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिक आता संतप्त झाले असून, प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
माकडांचा वाढता त्रास लक्षात घेता, वन विभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून राहू आणि पुढील अपडेट्स तुम्हाला देत राहू. दुर्गेश कान्हू.