राज्यातील निवृत्तीवेतनधारकांना जीपीएफ खात्यातील शिल्लक आणि इतर तपशील आता ऑनलाइन पाहण्याची सुविधा

नागपूर :- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना जीपीएफ खात्यातील शिल्लक आणि इतर तपशील आता ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या https://cag.gov.in/ae/nagpur/en या अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती प्रधान महालेखापाल जया भगत यांनी दिली.
या सुविधेमुळे महाराष्ट्र राज्य सरकारच्या विदर्भ आणि मराठवाडा प्रांतातील निवृत्तीवेतनधारक आणि सामान्य भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) अभिदात्यांना याचा लाभ घेता येईल. याचबरोबर सामान्य भविष्य निर्वाह निधीच्या जी.पी.एफ. स्लिप्स सहजपणे डाउनलोड करू शकतील. गत ५ वर्षांच्या जीपीएफ स्लिप्स देखील ऑनलाइन उपलब्ध असल्याचे नमूद केले आहे.
ही सेवा वापरण्यासाठी, जी.पी.एफ. अभिदात्यांनी प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या वेबसाइटवर जी.पी.एफ. टॅबखालील ‘जी.पी.एफ. तपशील’ विभागाला भेट द्यावी. त्यांची लॉगिन प्रमाणपत्रे प्रविष्ट करावी आणि अद्ययावत जी.पी.एफ. शिल्लक आणि गहाळ क्रेडिट (पत) तपशील मिळवावा. क्रेडीटमधे काही विसंगती आढळल्यास, अभिदाता पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक तपशील प्रधान महालेखापालांच्या कार्यालयात अपलोड करू शकतो असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
अंतिम पेन्शन प्रकरणांचा तपशील ऑनलाइन पाहण्याची सुविधा पेन्शनधारकांना अंतिम पेन्शन प्रकरणांची माहिती ऑनलाइन सुविधाद्वारे आता घेता येईल. पेन्शन प्रकरणे अंतिम केल्यानंतर, प्रधान महालेखापाल कार्यालय संबंधित पेन्शन मंजुरी अधिकारी/आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांना आपल्या पत्रांसह सेवापुस्तिका पाठवते. या बाबतची माहिती आता कार्यालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. यात गत तीन महिन्यांसह चालू महिन्यात अंतिम झालेल्या पेन्शन प्रकरणांची माहिती कार्यालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे प्रक्रिया सुलभ होण्यासह पारदर्शकता वाढली आहे.
महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना कार्यक्षम आणि पारदर्शक सेवा पुरवण्यासाठी नागपूरच्या प्रधान महालेखापालांद्वारा सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. अधिक माहितीसाठी कृपया कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.