नांदेडमध्ये महायुतीत पक्ष प्रवेशाची चढाओढ; भोकरमध्ये राष्ट्रवादीचा शक्तिप्रदर्शन!

नांदेड :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये राजकीय रणसंग्राम रंगतोय. महायुतीतील पक्ष प्रवेश सोहळ्यांमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपच्या बालेकिल्ल्यातच आपला विस्तार सुरू केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच नांदेड जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीतील नेते पक्ष प्रवेश सोहळ्यांद्वारे शक्तिप्रदर्शन करत असून, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटात चढाओढ दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भोकर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी याच ठिकाणी आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी मोठा राजकीय डाव टाकला आहे.
आज भोकर शहरात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीतील समीकरणे बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रताप पाटील चिखलीकर (आमदार, राष्ट्रवादी अजित पवार गट) :- बाईट
“अजित पवार साहेबांनी मला नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आम्ही पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. भोकरमध्ये झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याद्वारे याची सुरुवात केली आहे.”
तर भोकरमध्ये राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे महायुतीच्या समीकरणांमध्ये उलथापालथ होऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नांदेड जिल्ह्यात अजून किती राजकीय घडामोडी घडतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अशाच ताज्या अपडेट्ससाठी सिटी न्यूज सोबत राहा