नागपूर: कळमना पोलिसांची कारवाई, घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस

नागपूर :- नागपूरच्या कळमना पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. चोरीला गेलेल्या तब्बल ५.२९ लाखांच्या मुद्देमालापैकी ३.८२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये चार विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.
नागपूर शहरातील कळमना पोलिसांनी घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल करत मोठे यश मिळवले आहे. नवकल्या नगर आणि ब्रम्हानंद विद्यालयाजवळ दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या, ज्यात अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल मिळून तब्बल ५.२९ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील ११५ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यातून काही संशयितांची ओळख पटली. गुप्त माहितीच्या आधारे व शेजारील पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील विधीसंघर्षग्रस्त बालकांची चौकशी केली असता, चार बालकांचा सहभाग निष्पन्न झाला. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून ३.८२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त जिंकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे यांच्या पथकाने केली. या घटनेने नागपुरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागपूर पोलिसांनी अशा गुन्ह्यांचा तपास वेगाने करून शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.”पोलिसांच्या या वेगवान तपासामुळे घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.